मुंबई : पाणी पिण्याचे बरेच फायदे असतात. अनेक डॉक्टर आपल्या सुरुवातीपासून पाण्याच्या फायद्यांबद्दल सांगितले गेले आहे. पाणी केवळ आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही, तर त्यामध्ये असलेले फायदेशीर घटक आरोग्यासही लाभ देतात. पण नुकताच एक व्हिडीयो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये असं म्हटलं की पाण्याचे जास्त प्रमाण शरीरासाठी धोकादायक देखील ठरू शकते.
आजकाल अनेक आरोग्य तज्ज्ञ लोकांना तीन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण एका व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाण्यामुळे शरीराचं होणारं अति-हायड्रेशन आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. न्यूट्रिशनिस्ट रेणू राखेजा यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका चॅनल लिव्हिंगटिप नावाच्या व्हिडिओमध्ये हा दावा केला आहे.
आतापर्यंत 33 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. राखेजा यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ओव्हरहायड्रेशनमुळे शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळी खाली येऊ शकते. त्याची पातळी कमी केल्याने डोकेदुखी आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.
इलेक्ट्रोलाइटमध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असतं. म्हणजेच, इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यामुळे, या सर्व पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. आपल्या किडनी आणि हृदयाच्या योग्य कार्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण कमी झाल्यास किडनी आणि हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
राखेजा यांनी या व्हिडीओमध्ये, अति-हायड्रेशनचे इतर अनेक तोटे सांगितले आहेत. अति-हायड्रेशनमुळे ब्रेन फॉग, वजन वाढणं आणि डोकेदुखीचा धोका वाढू शकतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.
यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना धुळ्यातील डॉ. दर्शन कलाल म्हणाले, "प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला पाण्याची गरज ही वेगळी असते. शक्यतो सरासरी दीड ते दोन लीटर पाणी प्यायलं पाहिजे. केवळ पाणी हवं आहे म्हणून पाणी पिऊ नये. शरीराच्या गरजेनुसार प्रत्येक व्यक्तीने पाण्याचं सेवन केलं पाहिजे."
काही आरोग्याच्या समस्या अशा असतात ज्यामध्ये पाणी शरीरात टिकून राहतं. जसं की, काही हृदयाच्या समस्या आणि किडनीचे त्रास. अशा तक्रारी असलेल्या रूग्णांनी पाण्याच्या सेवनाबाबत डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे आहार कसा ठेवावा याबद्दल देखील डॉक्टरांशी बोलून घ्यावं, असंही डॉ. दर्शन यांनी सांगितलं आहे.