चिंता करायला लावणारी बातमी, मुंबईत 76 टक्के कोरोनाची रुग्णवाढ

Coronavirus in Mumbai : कोरोनाबाबत आता सावध करणारी एक अतिशय महत्त्वाची बातमी. गेल्या आठवडाभरात मुंबईत 76 टक्के रूग्णवाढ झालीय.  

Updated: Apr 27, 2022, 08:00 AM IST
चिंता करायला लावणारी बातमी, मुंबईत 76 टक्के कोरोनाची रुग्णवाढ  title=

मुंबई : Coronavirus in Mumbai : कोरोनाबाबत आता सावध करणारी एक अतिशय महत्त्वाची बातमी. गेल्या आठवडाभरात मुंबईत 76 टक्के रूग्णवाढ झालीय. मुंबई महापालिकेने कोरोना संसर्गाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. राजधानी दिल्लीसह काही राज्यात रूग्णसंख्या वाढत आहे. त्यातच मुंबईतही ही 76 टक्के रुग्णवाढही काळजी वाढवणारी आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करा, अशी शिफारच टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने आज पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

मुंबई महानगर पालिकेने सर्व आरोग्य यंत्रणेला कोविड सदृश लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार 10 ते 16 एप्रिलदरम्यान मुंबईत 294 कोविड रूग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत 17 ते 24 एप्रिलदरम्यान 519 कोविड रूग्ण आढळले. महापालिकेने पुन्हा एकदा पॉझिटिव्ह रूग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मागोवा घ्यायला सुरूवात केलीय. तसेच चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. 

राज्यात पुन्हा मास्क सक्ती 

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा मास्क सक्तीचा विचार सुरु आहे. मास्कसक्तीबाबत विचार करण्यासाठी टास्कफोर्सचा पुढाकार दिसून येत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केल्याचे वृत्त आहे.. एप्रिलमधले सर्वाधिक रुग्ण बुधवारी आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं अलर्ट झाले आहे. पुन्हा निर्बंध लागू करण्याचा एवढ्यात तरी विचार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र मास्क सक्ती पुन्हा एकदा लागू केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या राज्यात मास्क ऐच्छिक करण्यात आलाय. मात्र रुग्णसंख्येतली वाढ अशीच कायम राहिली तर मात्र मास्कसक्ती लागू केली जाऊ शकते.