लक्षणविरहित रूग्णांमध्ये नेमका कोणाचा समावेश?

केंद्र सरकारने कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे.

Updated: Jan 7, 2022, 08:13 AM IST
लक्षणविरहित रूग्णांमध्ये नेमका कोणाचा समावेश? title=

मुंबई : कोरोनाचे रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. केंद्र सरकारने कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हा कालावधी 14 दिवसांचा होता. तर सरकारने केवळ 7 दिवसांच्या होम आयसोलेशनची गरज असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्येही होम आयसोलेशनची ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार, लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना 7 दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात येणार आहे. सात दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर ताप नसेल तर या रुग्णांना पुन्हा कोविड चाचणी करण्याची गरज भासणार नाही.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे परंतु त्यांना ताप आणि खोकल्याची लक्षणं नाहीत तसंच आणि त्यांची ऑक्सिजन पातळी 93 पेक्षा कमी नाही, अशा रूग्णांना लक्षणविरहीत मानलं जातं.

सौम्य लक्षणं असलेले रुग्णांमध्ये, ज्यांना सर्दी, घसा खवखवणं आणि तापाची लक्षणं आहेत परंतु ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी नाही अशांचा समावेश आहे. 

मुंबईत विक्रमी रुग्णसंख्या

मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर धारावीत 107 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसह महापालिकेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.   

ओमायक्रॉनचे रुग्ण किती? 

राज्यात ओमायक्रॉनचे दिवसभरात 79 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. राज्यातील 79 पैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात एकूण ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 876 इतका झाला आहे.