Health News : सध्या तारुण्यावस्थेत असणारी किंवा नोकरीमध्ये रमलेली पिढी हल्लीच्या लहान मुलांकडे पाहून सातत्यानं म्हणताना दिसते, अरे आम्ही तर नुसते मातीत खेळत असायचो.... तुम्हीही कधी कुणाला असं म्हटलंय का? हल्लीच्या पिढीला उपजतच मिळालेल्या (Technology) टेकसॅव्हीपणामुळे मोबाईल जणू काही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लेकरांना काही कळण्याच्या आत हल्ली त्यांना युट्यूब काय, मोबाईल काय, हे सर्व काही माहिती झालेलं असतं. सुट्टीच्या दिवसांमध्येही ही बच्चे कंपनी मैदानांमध्ये जाऊन मनसोक्त खेळण्याचा आनंद घेण्यापेक्षा घराचा एखादा कोपरा धरून तिथंच तासनतास त्यांची सुट्टी व्यतीत करताना दिसते. हा त्या मुलांचा दोष आहे किंवा त्यांच्या पालकांना असं म्हणणं मुळीच नाही.
लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे मुलं बाहेर गेली की मातीत खेळणार (Kids playing in soil), मग कपडे, हातपाय सर्वकाही घाण होणार आणि आजारपणही ओढावणार या भीतीनेही बऱ्याचदा मुलांना घरातच थांबवलं जातं. पण, हे कितपत योग्य? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? (Benefits of playing in soil mud for kids read details)
ही बाब गंभीर आहे, कारण मुलं मातीपासून दुरावली जाताहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मागे धावता धावता ही छोटी मंडळी चिखल, मातीला भूतकाळात टाकत चालली आहेत. पण, हे त्यांच्या आरोग्यासही घातक. जर तुम्हीसुद्धा मुलांना मातीत खेळण्यापासून थाबवत असाल, तर आताच ही सवय सोडा. कारण असं केल्यास तुम्ही घोडचूक करत आहात.
BBC नं एका निरिक्षणाचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार धूळ- मातीमध्ये असेही काही घटक, सूक्ष्मजीव असतात ज्यांमुळं लहान मुलांना दमा (Asthama), allergy, दडपण, नैराश्य (Depression) यांपासून दूर ठेवतात. थोडक्यात चिखल- मातील खेळल्यामुळं मुलांच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो.
फक्त आरोग्यच (health) नाही, तर मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात पर्यायी मोकळ्या मैदानात खेळल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही (Mental health) याचा थेट परिणाम होतो. अगदी त्यांच्या विचारशक्तीपर्यंत हे बदल दिसून येतात. मुलांची एकाग्रता वाढते. वाळू, माती, चिखलात खेळत असताना मुलांच्या हालचाली, त्यांची निर्णयक्षमता आणि त्यांच्या संवेदना यांवरही थेट परिणआम दिसून येतात.
विश्वास बसणार नाही, पण मुलांच्या मानसिकतेला सुदृढ करायचं असल्यास मातीत खेळण्याहून उत्तम पर्याय नाही, असंच संशोधनातून सिद्ध झालं आहे. तेव्हा तुमची मुलं जर, चिखल, मातीत खेळत असतील, वाळूत बागडत असतील तर एकसारखं त्यांना अडवू नका. त्यांनाही स्वच्छंद जगू द्या. वातावरणाचा आनंद मनमुराद लुटूद्या!