दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशातील नागरिक कोरोनाशी लढा देतायत. यादरम्यान, डेल्टा तसंच ओमायक्रॉन असे नवे व्हेरिएंट देखील आपल्या समोर आले. कोरोनाचे विविध समोर येतायत त्यामुळे या साथीची भीती अधिक गडद होताना दिसतेय. तर आता ही भीती अजूनच वाढण्याची शक्यता आहे. कारण सायप्रस युनिवर्सिटीतून मिळालेल्या माहितीप्रमाणे, त्या ठिकाणी आता ओमायक्रॉन आणि डेल्टा यांचा समावेश असलेला एक नवा कोरोना व्हेरिएंट आढळलाय.
ओमायक्रॉन हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा कोरोना व्हेरिएंट असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर डेल्टाने गेल्या वर्षी अनेक देशांमध्ये कहर केला होता. अशा परिस्थितीत आता या दोघांच्या एकत्रित येण्याने नव्या रूपांमध्ये काय धोके असतील, याचा केवळ अंदाज लावला जाऊ शकतो.
ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या अहवालानुसार, सायप्रस युनिवर्सिटीच्या एका संशोधकाने हा नवा स्ट्रेन शोधला आहे. जो कोरोनाच्या ओमाक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचं मिश्रण असल्याचा दावा केलाय.
सायप्रस युनिवर्सिटीतील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिक्स यांनी, ओमायक्रॉन सारखी अनुवांशिक लक्षणं आणि डेल्टा सारखी जीनोम आढळून आल्यामुळे याला 'डेल्टाक्रॉन' असं नाव दिलंय.
अहवालानुसार, सायप्रसमध्ये आतापर्यंत डेल्टाक्रॉनचे 25 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान हा प्रकार किती घातक आहे आणि त्याचा परिणाम काय होईल यावर आतात सांगणं घाईचं ठरेलं.
कोस्ट्रिक्स म्हणाले की, हा स्ट्रेन अधिक पॅथॉलॉजिकल आहे, अधिक संसर्गजन्य आहे तसंच तो पूर्वीच्या दोन स्ट्रेनपेक्षा अधिक प्रभावी आहे का हे आम्ही शोधू. ओमायक्रॉन डेल्टाक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचं लक्षात येतंय.