Breast cancer : अवघ्या 50 रूपयांत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार

अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast cancer) प्रमाण वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.

Updated: Sep 13, 2022, 11:52 PM IST
Breast cancer : अवघ्या 50 रूपयांत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार  title=

मुंबई :  आता महिलांसाठी महत्त्वाची बातमी. अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast cancer) प्रमाण वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचाराबाबत टाटा मेमोरियल रुग्णालयातील (Tata Memorial Hospital) संशोधकांना मोठं यश मिळालंय. या कॅन्सरचा प्रसार रोखण्यासाठी संशोधकांनी एका इंजेक्शनचा शोध लावलाय. अवघ्या 50 रूपयांत हे इंजेक्शन मिळणारं आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट. (a big success for researchers at tata hospital an injection found for breast cancer)

स्तनांच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया केल्यानंतरही पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यावरच मुंबईतल्या टाटा मेमोरियल कॅन्सर रूग्णालयानं महत्वपूर्ण संशोधन केलंय. ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीपूर्वी ट्युमरच्या सभोवती लिग्नोकेन इंजेक्शन दिल्यास कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे सुन्न होतात आणि हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरत नाही असा दावा डॉक्टरांनी केलाय. विशेष म्हणजे या इंजेक्शनची किंमत केवळ 40 ते 50 रूपये इतकी असून यामुळे दरवर्षी तब्बल 1 लाख महिलांचे प्राण वाचण्यास मदत होणारेय.

टाटा रूग्णालयासह देशातील विविध 11 वैद्यकीय संस्थांनी 2011 ते 2022 या कालावधीत 1600 रूग्णांचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी 30 ते 70 वयोगटातील महिलांची दोन गटात विभागणी करण्यात आली. 800 महिलांवर जुन्या पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली तर इतर गटातील 800 महिलांवर इंजेक्शनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. 

दोन्ही गटातील महिलांच्या नियमित पाठपुराव्यासोबतच किमो, रेडिएशन आदी उपचारांचे पुढील प्रोटोकॉल करण्यात आले. फॉलोअपच्या 6व्या वर्षी इंजेक्शन वापरणा-या रुग्णांच्या आयुष्यात 30 टक्के सुधारणा दिसून आल्याचं दिसून आलं.

देशात दरवर्षी अडीच हजार महिलांवर ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र एका 50 रूपयांच्या इंजेक्शननं शरीरात पुन्हा ट्युमर होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी घटलीय. ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारासाठी हे मोठं वरदान म्हणावं लागेल.  अशी उपाचारपद्धती इतर प्रकारच्या कॅन्सरवर आल्यास विज्ञान जगतात ती खूप मोठी क्रांती ठरेल.