कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाणात सध्या वाढ झालीये. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे या समस्येत अधिक वाढ होतेय. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हार्ट अटॅकने निधन झालं आहे. त्यामुळे आता तरुण-तरुणी देखील हार्ट अटॅकच्या शिकार बनल्यात. आहेत ब्रिटनने यावर एक नवा उपाय शोधून काढलाय. हा उपाय म्हणजे हार्ट अटॅकवर शोधलेलं औषधं.
या नव्या उपायानुसार, लवकरच एक इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. या इन्जेक्शनमुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इंजेक्शनचे दोन डोस घेतल्याने हार्ट अटॅक टाळता येण्याची शक्यता आहे.
हृदयविकाराचा हा वाढता धोका कमी करण्यासाठी ब्रिटनमध्ये एक नवं औषध सापडलंय. ‘इनक्लिसिरान’ असं या औषधाचं नाव आहे. शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातंय. वर्षातून दोनवेळा हे इंजेक्शन घेतल्यास कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं, असं ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनं म्हटलंय.
मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये जास्त कोलेस्टेरॉल असलेल्या रूग्णांची संख्या सुमारे तीन लाख आहे. इनक्लिसिरानमुळे येत्या 3 वर्षात हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाण 10 लाखांवरून 5 लाखांवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पुढील दशकभरात 55 हजार हृदयविकार आणि पक्षाघात टळले जातील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय. यानुसार, किमान 30 हजार लोकांचे प्राण वाचू शकतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ब्रिटननं स्वित्झर्लंडच्या नोवार्टिस कंपनीशी करार केलाय.
सध्या ब्रिटनमधील तब्बल 65 लाख लोक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महागडी औषधं घेतायत. त्यांच्यासाठी किफायतशीर किंमतीत इनक्लिसिरान उपलब्ध करून दिलं जाणारे. हे औषध सहजपणे उपलब्ध झाल्यास अनेक जणांचा अकाली वयात मृत्यू होण्यापासून रोखता येणार आहे.