खरेखुरे दरोडेखोर कंगनासमोर आले अन्.....

दरोडेखोर, असं नुसतं म्हटलं तरीही़.... 

Updated: Jan 15, 2020, 04:33 PM IST
खरेखुरे दरोडेखोर कंगनासमोर आले अन्.....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत ही कायमच तिच्या ठाम आणि काहीशा वेगळ्या भूमिकांसाठी बॉलिवूड वर्तुळात चर्चेत असते. कोणाशी असणारे तिचे मतभेद असो, किंवा एखादी आव्हानात्मक भूमिका असो. कंगना कायमच स्वत:ची चांगली, वाईट अशी छाप सोडून जाते. मुळात तिच्याभोवती असणारी वादाची वलयंसुद्धा कमी नाहीत. बी- टाऊनची 'क्वीन' म्हणवणारी हीच अभिनेत्री एकदा चक्क दरोडेखोरांसमोर उभी होती. 

दरोडेखोर, असं नुसतं म्हटलं तरीही अनेकांची भंबेरी उडते. पण, कंगनाने तर त्यांच्याच भागात जात ती त्यांना सामोरी गेली. 'रिव्हॉल्वर रानी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या प्रसंगाविषयी खुद्द कंगनानेच उलगडा केला. द कपिल शरमा शो या कार्यक्रमात आपल्या 'पंगा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आली असतानाच कंगनाने एक असा प्रसंग सर्वांपुढे ठेवला जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

'रिव्हॉल्वर रानी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या प्रसंगाविषयी सांगताना कंगना म्हणाली, 'आम्ही चंबल येथे चित्रीकरण करत होतो. तेव्हा ती जागा धोकादायक असल्याचं दिग्दर्शकांनी सुरुवातीलाच बजावलं होतं. मुळात ती जागा चित्रीकरणासाठी योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं. पण, तरीही आमच्याकडून कोणताही विचार न करता याच ठिकाणी चित्रीकरण केलं गेलं.'

वाचा : भाचीच्या भेटीला आलेल्या सलमानला पाहून अर्पिता भावूक

जेव्हा कंगनाने त्या जागेत अशी काय वाईट गोष्ट आहे, असं निर्मात्यांना विचारलं तेव्हा खरी बाब तिच्यासमोर आली. चंबलमध्ये नेक दरोडेखोरांचं वास्तव्य होतं, हे तिच्यापुढे उघड झालं. ही माहिती मिळाल्यानंतर आपल्याला इथे चित्रीकरणासाठी का आणण्यात आलं आहे, असं विचारलं असता तू त्यांचा समना करु शकतेस इतकी धाडसी आहेस असं उत्तर तिला मिळालं. 

जेव्हा तुझा सामना कोणा दरोडेखोराशी झाला आहे का, असा प्रश्न कपिलने कंगनाला केला त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं. 'हो.... जेव्हा आम्ही परतत होतो, तेव्हा एका दरोडेखोरांच्या टोळीला आम्ही भेटलो होतो. तेव्हा त्यांनी आमच्यासोबत सेल्फी काढण्याची मागणी केली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कंगनाचे खूप चांगले मित्र साई कबीर यांनी कंगनाचं संरक्षण केलं होतं.