मुंबई : अनेकदा चित्रपट गाजतात ते म्हणजे त्यांच्या कलाकारांमुळे, दिग्दर्शकांमुळे नव्हे तर, त्यांच्या भव्य सेटमुळे. चित्रपटाचे सेट हीसुद्धा दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची आणि अर्थाच त्या चित्रपटाची वेगळी अशी ओळख असते. 'देवदास', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा चित्रपटांची नावं घेतल्यास त्यांचे अतिभव्य सेट डोळ्यांसमोर उभे राहतात. याच चित्रपटांच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एक अद्वितीय सेट असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित या चित्रपटाचा सेट कसा साकारण्यात आला, याविषयीचाच व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला. ज्यामध्ये 'कलंक'चा सेट साकारण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत आणि त्या सेटमागचे कलाकार या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
वरुण धवन म्हणजेच चित्रपटातील 'जफर' या सेटची सफर घडवून आणत असून, प्रत्येक गोष्टीविषयी माहितीही देत आहे. अत्यंत भव्य असा हा सेट साकारण्यासाठी जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ लागला. गतकाळातील वास्तू, एक वेगळी संस्कृती या साऱ्याचं दर्शन कलंकच्या सेटमधून होण्यासाठी खुद्द दिग्दर्शक अभिषेक वर्मन आग्रही होता. त्यामुळे कलाकारांच्या फौजफाट्याच्या सहाय्याने त्याने ही मजल मारली.
जवळपास तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये 'कलंक'चा सेट पाहून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे. शिवाय ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हेसुद्धा हा सेट पाहून आश्चर्यचकित झाले असून, त्यांना 'पाकिझा' या चित्रपटाच्या सेटची आठवण झाली आहे. एका वेगळ्याच दुनियेत नेणारा 'कलंक'चा हा सेट, त्यावर टीपण्यात आलेले असंख्य बारकावे आणि रोषणाई या साऱ्या गोष्टींची अनुभूती आता चित्रपट पाहतानाच लक्षात येणार आहे.
करण जोहरचं स्वप्नवत प्रोजेक्ट असणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट आणि वरुण धवन ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्याशिवाय माधुरी दीक्षित, संजय दत्त ही एकेकाळी गाजलेली जोडीही चित्रपटातून झळकणार आहे. आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू यांच्या भूमिका आणि सहकलाकारांची फौज यांच्या बळावर 'कलंक' बॉक्स ऑफिसवर गाजतो का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरेल.