मुंबई : सोशल मीडियामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांनी त्यांच्या गायन कौशल्याच्या बळावर सर्वांनाच थक्क केलं. कोलकात्यातील एका रेल्वे स्थानकात मंडल यांचं गाणं ऐकून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आणि पाहता पाहता त्यांची दखल थेट बॉलिवूडमध्ये घेण्यात आली. संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने मंडल यांना गाणं गात आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संधी दिली.
सर्वत्र प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांच्याविषयीच चर्चा सुरु असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या एका वक्तव्याने मात्र वेगळ्याच चर्चांना वाव दिला होता. कोणाचीही नक्कल करत तुम्ही दीर्घ काळ यशस्वी ठरु शकत नाही, अशा आशयाचं वक्तव्य लतादीदींनी केलं होतं. त्यांच्या या अशा बोलण्यानंतर आता खुद्द रानू यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रानू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. 'लताजींचं वय पाहती मी त्यांच्याहून लहान आहे. पुढेही राहीन. मला लहानपणापासूनच त्यांचा आवाज फार आवडतो', असं त्या म्हणाल्या. या मुलाखतीत आपल्याला सलमानने ५० लाख रुपयांचं घर भेट स्वरुपात न दिल्याचंही सांगितलं.
काय म्हणाल्या होत्या लतादीदी?
रानू मंडल यांना मिळालेल्या प्रसिद्धीविषयी सांगताना, 'माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कोणाचं आयुष्य मार्गी लागत असेल, कोणाला मदत होत असेल तर यात मी माझं भाग्यंच समजते. पण, मला असं वाटतं की, कोणाचीही नक्कल करुन तुम्ही दीर्घ काळासाठी यशस्वी ठरु शकत नाही. बरेच नवोदित गायक, गायिका या दिग्गजांची गाणी म्हणतात. किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांचीही गाणी ते गातात. पण, त्यामुळे त्यांना मिळणारी प्रसिद्धी ही फार कमी काळ टीकणारी असते. ते यश दीर्घ काळासाठी टीकत नाही', असं त्या म्हणाल्या होत्या.