Vikram Gokhale : विक्रम गोखले अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोखले यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Updated: Nov 26, 2022, 06:45 PM IST
Vikram Gokhale : विक्रम गोखले अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा title=

Vikram Gokhale Death : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रूग्णालयात होते, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज शनिवारी त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोखले यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकाळी याचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेर विक्रम गोखले अनंतात विलिन झाले.

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व गाजवलं. त्यांनी आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या सिनेमाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 'अनुमती' या  2013 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता.  विक्रम गोखले हे नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचं काम ते करत होते. 'गोदावरी' हा मराठी सिनेमा विक्रम गोखले यांचा अखेरचा सिनेमा ठरला. दरम्यान फक्त विक्रम गोखले नाही तर त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटकं

एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत.

विक्रम गोखले यांचे गाजलेले सिनेमे

'मॅरेथॉन जिंदगी' , 'आघात' हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट, 'आधारस्तंभ', 'आम्ही बोलतो मराठी', 'कळत नकळत', 'ज्योतिबाचा नवस', 'दरोडेखोर', 'दुसरी गोष्ट' , 'दे दणादण', 'नटसम्राट', 'भिंगरी' , 'महानंदा' ,' माहेरची साडी' आणि 'वासुदेव बळवंत फडके' त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

विक्रम गोखले यांना मिळालेले पुरस्कार

'अनुमती' या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.