मुंबई : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिची आत्महत्या ही तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी होती. ३० वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने अशी आत्महत्या करणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. तिने इंदूर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि मृत्यूपूर्वी राहुल नवलानी याच्यावर छळाचा आरोप करणारी चिठ्ठी लिहिली. राहुल आता अटकेत आहे. नुकताच वैशालीचा एक्स बॉयफ्रेंड शिवम शर्मा या अभिनेत्रीबद्दल बोलला आहे.
वैशाली ठक्कर आणि शिवम शर्मा 2013 ते 2015 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये चांगली मैत्री होती. शिवम वैशालीशी अधेमध्ये बोलत असायचा. अभिनेत्याने सांगितलं की, एक वर्षापूर्वी वैशालीने राहुलचा फोटो त्याला दाखवला होता आणि सांगितलं होतं की, दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र, जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा राहुल वैशालीला इतर कुणाशी लग्न करू देत नव्हता.
शिवम शर्मा यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "तिच्या आत्महत्येने मला धक्का बसला आहे. ती खूप खंबीर होती. जेव्हा कधी आम्ही भांडायचो तेव्हा ती घरभर डोक्यावर घ्यायची. ती असं पाऊल उचलू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. आमचं शेवटचं संभाषण या वर्षी जूनमध्ये माझ्या वाढदिवशी झालं होतं. मला तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. तिचं हसणं वेगळंच होतं. याबाबत मी तिला विचारलं असता, तिची तब्येत बरी नसल्याचं तिने सांगितलं. आता मला कळलं की ती खोटं बोलत होती."
शिवम शर्माने सांगितलं की, वैशालीने त्याला राहुलबद्दल सांगितलं होतं. शिवम म्हणाला, ''साधारण एक वर्षापूर्वी तिने मला राहुलबद्दल तिच्या प्रेमाविषयी सांगितलं आणि त्याचा फोटोही दाखवला. राहुलशिवाय त्याची पत्नीही त्याला त्रास देत होती. तिने कोणाशीही लग्न करून सोबत राहू नये अशी इच्छा राहुलची होती. तर वैशालीमुळे राहुल तिच्याशी एकनिष्ठ नाही हे तिच्या पत्नीने मान्य केलं होतं. ती कशातून जात होती हे कोणालाच कळत नव्हतं. याची माहिती कोणालाच आली नाही. आता आपल्याला ही गोष्ट घेवून पुढे जायचं आहे की, आपण तिला समजून न घेतल्याची खंत आहे. आम्हाला तिच्यासाठी न्याय हवा आहे."