वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तयारी शेवटच्या टप्पात आलेली असतानाच विविधतेने नटलेल्या या देशामध्ये येण्यापूर्वी ट्रम्प यांनी एक ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं. अमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी या चित्रपटासंदर्भात एक ट्विट केलं. त्याच ट्विटला 'ग्रेट' अस म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केलं.
ट्रम्प यांनी या ज्या चित्रपटाची प्रशंसा करत ट्विट केलं तो चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला आयुष्मान खुराना याची मुख्य भूमिका असणारा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी भारतीय कलाविश्वातील एका अप्रतिम कलाकृतीची प्रशंसा खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केल्यामुळे नेटकाऱ्यांकडून 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याविषयी सध्या भारतात बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोमवारपासून ट्रम्प भारत दौऱ्य़ावर असणार आहेत. गुजरातला भेट दिल्यानंतर ते आग्र्याच्या दिशेने रवाना होतील. ज्यानंतर नवी दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
Great! https://t.co/eDf8ltInmH
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 21, 2020
एकिकडे ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे 'शुभ मंगल....' या बॉलिवूडच्या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून समलैंगिक प्रेमसंबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये या दोन्ही अभिनेत्यांनी 'गे' कपलची भूमिका साकारली आहे.