मुंबई : टीव्हीची सुपरहिट 'मधुबाला' म्हणजेच अभिनेत्री दृष्टी धामीनं आपल्या कार्यक्रमाच्या प्रोड्युसरवर संपूर्ण मानधन न दिल्याचा आरोप केलाय.
'मधुबाला - एक इश्क एक जुनून'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसलेल्या दृष्टीनं आपल्या सिरीयलचा प्रोड्युसर अभिनव शुक्ला याच्याविरोधात हा आरोप केलाय. अभिनवनं आत्तापर्यंत आपलं संपूर्ण मानधन दिलेलं नाही, असं तिचं म्हणणं आहे. यासाठी तिनं 'सिंटा'चा दरवाजाही ठोठावलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, दृष्टीला तिच्या कामाचा मोबादला म्हणून मिळणाऱ्या एकूण मानधनापैंकी ३६ लाख रुपये अद्याप देण्यात आलेले नाही. हा कार्यक्रम २०१२ ते २०१४ पर्यंत टीव्हीवर दिसत होता... आणि हीटही ठरला होता. आता दृष्टीनं याविरोधात 'सिने अॅन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (CINTAA) मध्ये तक्रार दाखल केलीय.
तर प्रोड्युसरच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमातून त्याला कोणताही फायदा मिळालेली नव्हता त्यामुळे, जेव्हा त्याला पुढचा कार्यक्रम मिळेल, तेव्हाच तो उरलेले पैसे देऊ शकेल.
रिपोर्टनुसार, अभिनव शुक्ला याला अशाच प्रकरणांमुळे यापूर्वीच टीव्ही सर्कलनं बॅन केलंय. परंतु, आता 'सिंटा' कलाकारांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होणार का? याकडेही दृष्टीप्रमाणेच इतर कलाकारांचंही लक्ष लागलंय.
छोट्या पडद्यामागे घडलेली ही काही पहिली घटना नाही. याआधीही 'मेरी आवाज ही पहचान है'मधून प्रेक्षकांसमोर आलेली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अमृता रावनंही असाच आरोप केला होता.