मुंबई : राणा-अंजलीच्या प्रेमाने नटलेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला मध्ये सध्या राणाचा डाएट सोहळा चांगलाच रंगतोय. मॅनेजरबाई तर राणाच्या मागे चांगल्या हात धुवूनच लागल्यात. राणाने काही खावू नये म्हणून अंजली आणि मॅनेजरबाई राणाला खोलीत कोंडून ठेवतात. त्यामुळे रागावलेला राणा भिंतीवर हात आपटून स्वतःला जखम करुन घेतो. त्यामुळे अंजली आणि मॅनेजरबाई खोलीचे दार उघडतात. मग रागवलेल्या राणाला मॅनेजरबाई डाएटचं महत्त्व समजवून सांगतात आणि त्याच्याकडून डाएट करण्याचं वचन घेतात. राणाही लगोलग शब्द देतो.
पण राणा आणि डाएट? भूकेने व्याकूळ होऊन चोरुन खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणाला अंजली आणि लाडू रंगेहात पकडतात. मग चिडलेल्या अंजलीबाईंना राणा शांत करतो आणि डाएट करण्याचं वचन देतो.
दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी आतुर झालेल्या राणाला मॅनेजरबाई पुन्हा आडवतात. आणि हेल्दी खाण्याचा आग्रह धरतात. पण राणा काही ऐकत नाही. मग व्हिटॉमिन्स, प्रोटीन्ससाठी अंजली काही नैसर्गिक उपाय सुचवते. मग काय राणादा खूश. खायला मिळणार या एका गोष्टीमुळे राणादा भयंकर खूश होतो. पण आता हे सगळं डाएट प्रकरण राणा कसं सांभाळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.