'छपाक'नंतर आता दीपिकाच्या 'या' जाहिरातीलाही विरोध

दीपिकावर आणखी एक वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे.

Updated: Jan 13, 2020, 07:40 PM IST
'छपाक'नंतर आता दीपिकाच्या 'या' जाहिरातीलाही विरोध title=

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये काही बुरखाधाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्लाचे मुंबई, दिल्लीतही पडसाद पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये दाखल झाली होती. जेएनयूमध्ये दीपिकाने कोणतंही वक्तव्य केलं नाही. पण तिच्या तिथे जाण्यानंतर अनेकांकडून दीपिकावर टीका करण्यात आली. जेएनयूमध्ये गेल्यानंतर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाला काही लोकांकडून विरोध होऊ लागला. आता ट्विटरवर काही लोकांकडून 'लक्स' कंपनीलाही इशारा देण्यात येत आहे. 

'छपाक'च्या प्रदर्शनानंतरही दीपिकावर टीका होते आहे. 'छपाक' चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादात असलेल्या दीपिकावर आणखी एक वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही तासांपासून #दीपिका_हटाओ_LUX_बचाओ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करतोय. ट्विटरवर काही लोकांकडून लक्स ब्रँडला वाचवण्याबाबत बोललं जात आहेत. लक्स ब्रँडला वाचवायचं असेल तर दीपिकाला हटवण्यात यावं अशा आशयाच्या चर्चा होत असल्याचं चित्र आहे. हा ब्रँड देशविरोधी असणाऱ्या हातात असल्याचंही ट्विट करण्यात येत आहे.

१० जानेवारी रोजी दीपिकाचा 'छपाक' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच दीपिकाने जेएनयूत भेट दिली होती. याचा चित्रपटाच्या बॉक्सऑफिस कमाईवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. तीन दिवसांत 'छपाक'ने जवळपास १८ कोटींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ३५ ते ४० कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, २०१६ मध्ये अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं होतं. स्नॅपडीलकडून आमिर खानला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून हटवण्यात आलं होतं. त्यावेळी आमिर खानने एका कार्यक्रमादरम्यान भारतात असहिष्णुता वाढत असल्याचं म्हटलं होतं. यावरुनच आमिरच्या पत्नीने भारतात सुरक्षित वाटत नसल्याने भारत सोडून जाण्याबाबत वक्तव्य केलं होतं. सोशल मीडियावर आमिरला देशद्रोही असंही बोललं गेलं होतं.

याप्रकरणानंतर, स्नॅपडीलला अनेकांनी इशारा देत, आमिर खान या ब्रँडशी संबंधित असल्याने हे ऍपही वापरणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र आमिरला स्नॅपडीलचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून हटवण्यात आलं होतं.