मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि चित्रपट प्रेमींमध्ये एका चित्रपटाचा बराच बोलबाला आहे. हा चित्रपट म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (the kashmir files). अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कमाईवरही चांगलीच छाप पाडली आहे.
चित्रपटाला मिळणारी वाढती लोकप्रियता पाहता आता 650 स्क्रीन्सवरून हा चित्रपट तब्बल 4 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा आकडा येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात येत आहे.
'पुष्पा'ला टक्कर...
अभिनेता अल्लू अर्जुन याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पुष्पा' या चित्रपटानं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं. याचे थेट परिणाम कमाईवरही दिसून आले.
1450 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेलल्या या चित्रपटाचा निर्मिती खर्च 250 कोटींच्या घरात आहे. आतापर्यंत या चित्रपटानं भारतात 300 कोटींहून अधिकची कमाई केली.
आंतरराष्ट्रीय कमाईचा आकडाही तितकाच मोठा असल्यामुळं 'पुष्पा'नं एक मैलाचा दगडच प्रस्थापित केला. राहिला मुद्दा असा, की खरंच आता 4 हजार स्क्रीन मिळाल्यामुळं 'द कश्मीर फाइल्स' (the kashmir files) हा पल्ला गाठणार का?
'पुष्पा' व्यतिरिक्त 'द कश्मीर फाइल्स' (the kashmir files) समोर 'सूर्यवंशी' आणि '83' या तगड्या निर्मिती खर्च असणाऱ्या चित्रपटांचंही आव्हान आहे. तेव्हा आता एक संघर्षमय कथानक रुपेरी पडद्यावर आणणारा हा चित्रपट त्याच्याशी स्पर्धा असणाऱ्यांना नमवतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.