मुंबई : मागील कित्येक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' KBC या कार्यक्रमानं अनेकांना लाखो आणि कोट्यवधी रुपये जिंकण्याची संधी दिली. इथं येणारा प्रत्येक स्पर्धक किमान रक्कम तरी जिंकत आणि आयुष्यभराच्या आठवणी एकवटत परत जातो. या कार्यक्रमाला आणखी खास करतात ते म्हणजे सूत्रसंचालन करणारे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची अनोखी शैली. सोबतच प्रेक्षकांचं अमाप प्रेमही या कार्यक्रमाला मिळणाऱ्या लोकप्रियतेस कारणीभूत आहे. अशा या कार्यक्रमात नववी इयत्ता शिकलेल्या एका व्यक्तीनं चक्क ६.४० लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे.
केबीसीच्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये राजस्थानमधील रघुनाथ राम नावाचे स्पर्धक सहभागी झाले. यावेळी त्यांनी अमिताभ यांच्यासह इतरही उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमात ६.४० लाख रुपयांसाठी हिंदू धर्मग्रंथ रामायणाशी संबंधित एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
प्रश्न- रामायणानुसार, रावणाच्या तलवारीचं नाव काय होतं?
असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ज्याचं अगदी अचूक उत्तर त्यांनी दिलं. रावणाच्या तलवारीचं नाव 'चंद्रहास' असल्याचं रघुनाथ यांनी सांगत ही लाखोंची रक्कम जिंकली. त्यांना यापुढील प्रश्नाचं उत्तर मात्र न जमल्यामुळं अखेर या स्पर्धेतून त्यांनी काढता पाय घेतला.
अवघ्या सहा सेकंदांत दिलं उत्तर...
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळं रघुनाथ राम यांना पुढचं शिक्षण घेता आलं नाही. पण, ही बाब त्यांना इथवर येण्यापासून थांबवू शकली नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण फास्टेस्ट फिंगर फर्सटमध्ये अवघ्या सहा सेकंदांत त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. ज्यामुळं ते हॉट सीटपर्यंत पोहोचले.