Sindhutai Sapkal : 'चिंधी'कडून सिंधुताई यांना भावनिक निरोप

चित्रपटात सिंधुताई सपकाळ साकारणाऱ्या तेजस्विनीने व्यक्त केली भावना 

Updated: Jan 5, 2022, 11:54 AM IST
Sindhutai Sapkal : 'चिंधी'कडून सिंधुताई यांना भावनिक निरोप title=

मुंबई : अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच वयाच्या 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माईंच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सिंधुताई यांच्या जीवनावर 2010 साली 'मी सिंधुताई सपकाळ' हा सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये तेजस्विनी पंडितने माईंची भूमिका साकारली होती. सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितनेही एक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माईंच्या निधनावर अनेकांनी तेजस्विनीच्या प्रतिक्रियेची वाट पाहिली मात्र तिने सोशल मीडियावर किंवा कुठेही कोणतीच भावना व्यक्त केली नव्हती. मात्र आता धक्यातून सावरल्यावर तेजस्विनीने आपली भावना व्यक्त केली आहे.

तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट 

“अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! “अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई,” असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे. 

सिंधुताई सपकाळ यांच 'हे' अखेरचे शब्द 

प्रत्येकाला 'बाळा' म्हणून हाक मारणाऱ्या सिंधुताई अनेकांची माय होत्या. जन्म न देता त्यांनी अनेक अनाथ बालकांना त्यांनी आईची माया दिली. म्हणून त्या सगळ्यांच्या "माई'' होत्या. माईंना अखेरच्या क्षणी कोणाची काळजी होती. तर ती म्हणजे आपल्या पिल्लांची. हे होते सिंधुताईंचे अखेरचे शब्द 'माझी मुले कशी आहेत. माझ्या मुलांची काळजी घ्या,'हे होते सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द. अखेरच्या क्षणी देखील त्या माईला काळजी होती ती आपल्या पिल्लांची.. शेवटच्या क्षणी देखील मुलांचीच काळजी सिंधुताई सपकाळ यांना होती.