मुंबई : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेच्या माध्यमातून शिवबांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या भेटीस अला. प्रेक्षकांनी मालिकेला डोक्यावर घेतलं. आजही मालिकेतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही वर्षांपूर्वी 'झी मराठी' वाहिनीवर 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका रोज प्रेक्षकांच्या भेटीस यायची. पण आता मालिका प्रेक्षकांना सिनेमातून अनुभवता येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी अभिनेते डॉ. कोल्हे यांच्या खांद्यावर होती. संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले.
मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा संभाजी राजांना अनुभवता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून पुन्हा एकदा संभाजी महाराजांचा सुवर्ण इतिहास सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
खास तंत्रज्ञानाचा वापर करून मालिकेचं सिनेमात रुपांतर करण्यात येणार आहे. 1 मे पासून रविवारी 12 वाजता सिनेमा टीव्हीवर दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवता येणार आहे.