मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आसिफ भामला आणि अरुण मोटवानी देखील उपस्थित होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली. याचात कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
जर ही फक्त आत्महत्या आहे तर ही केस बंद होणं अपेक्षित आहे पण याप्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित करत शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशा मागणी केली.
दरम्यान सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. या साऱ्यामध्येच मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला.
शिवाय मंगळवारी रात्री पाटण्यामधील राजीव नगर पोलीस स्थानकात सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एक तक्रार दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.