सुनील ग्रोवरच्या मुलाला का नाही आवडत गुत्थी? धक्कादायक कारण समोर

सोनी टीव्हीवरील खळखळून हसवणारा रियालिटी शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'. मात्र प्रेक्षकांना हसवताना या कलाकारांना किती कठीण प्रसंगातून जावं लागतं याचा प्रत्यय एका घटनेतून आला आहे

Updated: Apr 19, 2022, 10:50 AM IST
सुनील ग्रोवरच्या मुलाला का नाही आवडत गुत्थी? धक्कादायक कारण समोर title=

मुंबईः  'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी रियालिटी शोमधील एक अतरंगी पात्र म्हणजे गुत्थी अर्थात अभिनेता सुनील ग्रोवर. सुनीलने साकारलेलं प्रत्येक स्त्री पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. गुत्थी असो किंवा रिंकू भाभी, स्त्री पात्र साकारताना सुनील आपलं कसब पणाला लावतो.

त्यामुळे ती भूमिका खुलते आणि प्रेक्षकांना ती भूमिका भावते. मात्र या हसवणाऱ्या चेहऱ्यामागे असणारं दुःख नुकतंच सुनीलने त्याच्या एका मुलाखतीत उघड केलं

 

सुनीलने सांगितलं की माझं स्त्री पात्र साकारणं माझ्या मुलाला आवडत नाही. स्त्री भूमिकेमुळे मुलाचे मित्र त्याला चिडवतात त्यानंतर तो निराश होतो असं सुनील म्हणतो.

त्यामुळे तुम्ही स्त्री भूमिका करू नका अशी विनंती मुलाने सुनीलला केली. मुलाच्या या मागणीमुळे सुनीलही किंचित व्यथित झाल्याचं त्याने सांगितलं. मात्र सुनीलचं कामावरचं प्रेम आणि विश्वास दृढ होता.

आपण नक्कीच चांगलं काम करतोय हे पटवून देण्यासाठी सुनीलने एक शक्कल लढवली ज्यामुळे मुलाला आपल्या वडिलांच्या कामाचा अभिमान वाटू लागला

अभिनेता सुनील ग्रोवरला स्त्री पात्राच्या भूमिकेमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. प्रेक्षकंही त्याच्या कामावर भरभरून प्रेम करतात. हेच प्रेम दाखवण्यासाठी सुनीलने मुलाला खरेदीनिमित्त 

एका मॉलमध्ये नेलं. त्यावेळी सुनीलला पाहाताच अनेक चाहते त्याच्या आजूबाजूला जमा झाले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. हीच गोष्ट मुलाला दाखवत त्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी लागणारी मेहनत मुलाला दाखवली.

हे चित्र पाहिल्यानंतर मुलालाही वडिलांच्या कामाचा अभिमान वाटू लागल्याचं सुनील सांगतो.