राष्ट्रगीत ऐकून....; देश आणि देशभक्तीबाबत राजामौलींचं मोठं वक्तव्य

देश आणि देशभक्ती 

Updated: Jan 10, 2022, 04:37 PM IST
राष्ट्रगीत ऐकून....; देश आणि देशभक्तीबाबत राजामौलींचं मोठं वक्तव्य  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय चित्रपटांच्या दुनियेत आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला चित्रपट साकारणारे दिग्दर्शक म्हणून एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचं नाव प्रसिद्ध आहे. विविध पटलांवर आपल्या दिग्दर्शन कलेची छाप उमटवत असतानाच ते आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहेत जिथून मागे वळून पाहणंही अशक्य आहे. 

'बाहुबली'सारखा तगडा चित्रपट साकारणारे हेच राजामौली आता 'RRR' या चित्रपचा नजराणा प्रेक्षकांसाठी आणत आहेत. 

आगामी चित्रपटाच्याच निमित्तानं राजामौली सध्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. मुलाखतींमध्ये सहभागी होत आहेत. 

अशाच एका मुलाखतीमध्ये त्यांनी देश आणि देशभक्ती या मुद्द्यांवर काही महत्त्वाचे मुद्दे आणि स्वत:च्या भूमिका स्पष्ट केल्या. 

'देशभक्ती' (Nationalism)अर्थात एका अशा भावनेबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली ज्याबाबत सहसा कोणताही सेलिब्रिटी सावरुनच बोलतो. 

काय म्हणाले राजामौली? 
'मी कधीच माझ्या देशभक्तीचं प्रदर्शन केलं नाही. देशावर प्रेम केलंच पाहिजे असं मला लहानपणापासून शिकवलं गेलं नाही' असं त्यांनी स्पष्ट केलं. 

लहानपणापासून इतिहास, शौर्यगाथा आणि इतर नितीमय रचनांबाबत मला सांगितलं गेलं ज्यांच्यातून देशाप्रती सन्मान आणि आपलेपणाची भावना झळकत होती. 

आजही जेव्हा केव्हा राष्ट्रगीत माझ्या कानी पडतं आपोआपच माझे डोळे पाणावतात, असं म्हणत कारण ठाऊक नसतानाही आपण भावूक होतो अशी बाजू त्यांनी मांडली. 

मी कट्टरतावादी नाही असं म्हणत कोणाचीही बाजू घेत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

मी आपल्या देशावर प्रेम करतो, याचा अर्थ असा नाही की मी इतर देशांचा द्वेष करतो. मी आपल्या माणसांवर प्रेम करतो, पण इतरांची घृणा करत नाही. 

मला माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे. पण, इतर संस्कृतींचाही मी आदर करतो. माझ्यासाठी अर्थात माझा देश सर्वश्रेष्ठ आहे आणि असेल, अशा शब्दांत राजामौली यांनी आपलं देशप्रेम सर्वांपुढे ठेवलं.