मुंबई : दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच पार्थिव शरीर सोमवारी मुंबईत आणलं जाऊ शकतं. दुबईतील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवींच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. पण पोलिसांचा अंतिम रिपोर्ट तयार झाला नाही.
शवविच्छेदन अहवाल पूर्ण झालाय पण फॉरेन्सिक अहवाल नसल्याचे वृत्त खलीज टाइम्सने दिले आहे.
पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात. हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात.
यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.
श्रीदेवी नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यावेळी त्यांच्यासोबत नवरा बोनी कपूर आणि छोटी मुलगी होती
१९६३ साली जन्म झालेल्या श्रीदेवींनी १९६७मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. श्रीदेवींनी हिंदीबरोबरच तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्ल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २०१२ साली त्यांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून कमबॅक केलं. २०१३ साली त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
सामान्य प्रोटोकॉलनुसार दुबईमध्ये हॉस्पीटलच्या बाहेर मृत्यू झाल्यास शोध घेण्यास २४ तासाहून अधिक वेळ लागतो. श्रीदेवी मृत्यूप्रकरणी सर्व प्रोटोकोल पाळण्यात येत असून दुबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.