'या' अडल्ट स्टारच्या जीवनावर साकारतोय चित्रपट, 'तिची' झलकही पाहता येणार

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीने अडल्ट स्टारची भूमिका साकारण्याची जबाबदारी घेतली आहे 

Updated: Oct 30, 2018, 02:52 PM IST
'या' अडल्ट स्टारच्या जीवनावर साकारतोय चित्रपट, 'तिची' झलकही पाहता येणार  title=

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपट विश्वात बायोपिकचा ट्रेंड चांगलाच स्थिरावला आहे. विविध आणि बहुरंगी व्यक्तीमत्वांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटांतच आता भर पडणार आहे ती म्हणजे शकीलाच्या बायोपिकची. 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अडल्ट स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकीला यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. 

अभिनेत्री रिचा चड्ढा या चित्रपटात शकीलाची व्यक्तीरेखा साकारत असून, तिने या भूमिकेसाठी खुद्द शकीला यांच्याकडूनच काही गोष्टींसाठी मदत घेतली होती. 

इंद्रजित लंकेश दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीलाच तिने शकीला यांच्या जीवनशैलीला अगदी जवळून पाहिलं होतं. अशा या अभिनेत्रीची कारकिर्द आणि अडल्ट स्टार होईपर्यंतचा तसंच त्यापुढील प्रवास नेमका कसा होता यावर या बायोपिकमधून प्रकाश टाकण्यात येत आहे. 

शकीला यांच्या कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकता त्यांच्या वाटेला आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींना सामोरं जात आपल्या अस्तित्वासाठी प्रयत्नसील असणाऱ्या या अडल्ट स्टारचा प्रवास सध्या हे कलाकार मंडळी मोठ्या आत्मियतेने साकारत आहे. 

खुद्द शकीलासुद्धा स्वत:च्याच बायोपिकमध्ये झळकणार आहेत. त्या चित्रपटात एका पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. खुद्द चित्रपट दिग्दर्शकानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटातील रिचाचा लूक आणि एकंदरच या चित्रपटाच्या सेटवरील फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आता येत्या काळात अभिनय क्षेत्रातील दाहक वास्तव आणि अडल्ट स्टारचा प्रवास प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.