मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. तर अनेकदा अफवाही पसरल्या. पण आता सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम लागणार आहे. कारण सोनम आणि आनंद लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
सोनम आणि आनंद यावर्षी जूनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळते आहे. विरुष्काप्रमाणे हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी ते लंडनला जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, सोनम वीरे दी वेडींग हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर विवाह करणार आहे. मात्र दोन्ही कुटुंबियांकडून याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सोनमने एका मुलाखतीत सांगितले की, लग्नाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यावेळेस दोन्ही कुटुंब एकत्र एका छताखाली येतात. लग्नाची तयारी, नवरीचे नटणे हे सर्व मला प्रिय आहे. त्याचबरोबर लग्नाच्या वेळेस होणारे सोहळे, रितीरिवाज मला खूप आवडतात. लग्नासाठी मी माझ्या आई-वडीलांना रोल मॉडल मानते. त्याचबरोबर लग्न कसे होते त्यापेक्षा ते किती यशस्वी होते, हे जास्त महत्त्वाचे आहे.
लवकरच सोनम जोया फॅक्टर या सिनेमात झळकेल. यात डी.सलमान प्रमुख भूमिकेत आहे. याची माहिती सोनमने एका ट्विटर पोस्टद्वारे दिली. हा सिनेमा पुढच्या वर्षी ५ एप्रिलला प्रदर्शित होईल.