मुंबई : सोनाली बेंद्रेला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असला तरी तिच्यातील उमेद, आशा आणि सकारात्मकता अजून जिवंत आहे. सोनाली वेळोवेळी आपल्या चाहत्यांना तब्बेतीची माहिती देत असते. आज सोनालीच्या मुलाचा रणवीरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोनालीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि खास मेसेज लिहिला.
सोनालीने लिहिले की, ''माझा सुर्य, चंद्र, तारा आणि संपूर्ण आकाश. मी थोडी मेलोड्रामॅटिक होत असेन पण तुझ्या १३ व्या वाढदिवसानिमित्त तू यास पात्र आहेस. आता तु टिनएजर झाला आहेस. ही गोष्ट समजण्यास मला थोडा वेळ लागला. मी तुला नाही सांगू शकत की मला तुझा किती अभिमान आहे. तुझी बुद्धी, तुझा विवेक, तुझी ताकद, तुझा निष्पापपणा आणि तुझी मस्ती देखील. हॅप्पी हॅप्पी बर्थडे माझ्या मोठया झालेल्या बाळा. असे पहिल्यांदा होत असेल की, तुझ्या बर्थडेला आपण सोबत नाही आहोत. मला तुझी प्रचंड आठवण येते. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे नेहमीच आणि कायम... बिग हग...''
काही दिवसांपूर्वीच सोनालीने फ्रेंडशीप डे निमित्त आपल्या खास मैत्रिणींसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर बुक स्टॉलमध्ये पुस्तक खरेदी करतानाचाही सोनालीचा फोटो समोर आला होता.