रानू मंडल यांच्या मुलीनेही गायलं गाणं; व्हिडिओ व्हायरल

 आयुष्याला कलाटणी मिळणं म्हणजे नेमकं काय...

Updated: Sep 10, 2019, 01:21 PM IST
रानू मंडल यांच्या मुलीनेही गायलं गाणं; व्हिडिओ व्हायरल  title=
रानू मंडल यांच्या मुलीनेही गायलं गाणं; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आयुष्याला कलाटणी मिळणं म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचं उत्तर रानू मंडल यांच्याकडे पाहताना मिळतं. एका रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांचा गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झाला. हा व्हि़डिओ असंख्य नेटकऱ्यांनी पाहिला आणि शेअरही केला. परिणामी रानू मंडल यांना थेट कलाविश्वात गाणं गाण्याची संधी मिळाली.  

सुरेल आवाजाची दैवी देणगी मिळालेल्या रानू यांच्या मुलीचाही एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक वर्षे आईपासून दूर राहिल्यानंतर आता त्यांची मुलगी एलिझाबेथ ही त्यांच्याकडे परतली आहे. आईप्रमाणेच तिलाही सुरेल आवाज लाभला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता सहज याचा अंदाज लावता येत आहे. 

खुद्द रानू मंडल यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या मुलीचा गातानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती आईच्या साथीने 'ब्रह्मचारी' या चित्रपटातील, 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे...' हे गाणं गाताना दिसत आहे. एलिझाबेथचा आवाज पाहता, तिचा अंदाजही अनेकांची मनं जिंकणारा ठरत आहे.  

व्हायरल व्हिडिओमुळे आता रानू मंडल यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलीलाही कलाविश्वात अशीच सुवर्णसंधी मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच रानू मंडल यांच्याकडून संगीत दिग्दर्शक- गायक हिमेश रेशमिया याने त्यांच्याकडून गाणं गाऊन घेतलं. हिमेशने दिलेल्या मदतीचा हात आणि रानू यांना मिळालेल्या प्रसिद्धीच्या बळावर खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. खऱ्या अर्थाने नशिबाने त्यांच्यावर सुखाची उधळण केली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.