मुंबई : सोशल मीडियाचा वापर केवळ टाइमपाससाठीच होतो असं नाही, तर त्यातून अनेकदा सरप्राइजेसही मिळतात.
निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' या चित्रपटातल्या हिरोची निवड ही चक्क फेसबुकवरून झाली आहे. सांगलीच्या वैभव कदमनं ही भूमिका साकारली असून, या चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
‘यंटम'साठी आम्ही राज्यभरात विविध ठिकाणी ऑडिशन्स घेतल्या होत्या. हिरोच्या भूमिकेसाठी जवळपास तीनशे जणांची ऑडिशन झाली. मात्र त्यात कुणीच पसंत पडत नव्हतं. या भूमिकेसाठी आम्ही काही वैशिष्ट्यं निश्चित केली होती. त्याच्या चेहऱ्यात साधेपणा असावा किंवा त्याचे केस सिल्की असावेत... बराच काळ शोध घेऊनही आम्हाला हवा तसा चेहरा मिळेना. मध्यंतरी एके दिवशी फेसबुकवर मित्रांच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोणी सापडतं का हे पहात होतो. त्यावेळी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती वैभवची होती. त्याचे फोटो पाहिले. त्यातल्या एका फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. वैभवला पाहिल्यावर मला "यंटम"चा हिरो सापडला. मग मी त्याला मेसेज पाठवला. त्यानं मला त्याच्या शॉर्टफिल्मची लिंक पाठवली. ती शॉर्टफिल्म पाहिल्यावर मला जाणवलं, की त्याच्यात अभिनयाचा स्पार्क आहे. पण त्याच्यावर थोडं काम करावं लागेल. त्यानुसार त्याचं एक वर्कशॉप घेतलं. सहा महिने वर्कशॉपमध्ये तो छान शिकला आणि चित्रीकरणासाठी उभा राहिला,’ असं समीरनं सांगितलं.
‘या चित्रपटात सयाजी शिंदेंसारखे अनुभवी कलाकार असूनही त्यांच्यासमोर तुषार डगमगला नाही. अतिशय समजूतदारपणानं आणि सहजतेनं त्यानं त्याची भूमिका साकारली. त्याचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,’ असंही समीर म्हणाला.
'यंटम’ चित्रपटाची कथा पटकथा संवाद समीरसह मेहुल अघजा यांनी लिहिले आहेत. संगीत हा या चित्रपटाचा महत्त्वाचा घटक असून, चिनार-महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. मंगेश कागणे यांनी गीतलेखन केलं आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे