गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात

अभिजीतच्या म्हणण्यानुसार, ही महिला आपल्याला धमक्या देत होती

Updated: Aug 14, 2018, 02:24 PM IST
गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात title=

मुंबई : एकेकाळी शाहरुख खानचा आवाज म्हणून ओळखला जाणारा गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात अडकलाय. एका महिलेनं अभिजीतवर अभद्र व्यवहार केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी या महिलेनं पोलिसांतही तक्रार दाखल केलीय. 

या महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, अभिजीतनं फोनवर सुरू असलेल्या संभाषण आणि वादा दरम्यान शिवीगाळ केली.... आणि अभद्र शब्दांचा वापर केला. या आरोपावरून अभिजीतवर कलम ५०९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलीय. शिवाय आयपीसी कलम ५०६ नुसार तक्रार नोंदविण्यात आलीय. 

परंतु, अभिजीतच्या म्हणण्यानुसार, ही महिला आपल्याला धमक्या देत होती... आपल्याकडून जबरदस्तीनं वसुली करण्याचा प्रयत्न ती करत होती... एक कमर्शिअल जागा अभिजीतनं भाडेतत्वावर वापरण्यासाठी दिली आहे... तिथं आपल्या भाडेकरूंनी काही काम केलं... त्यावर या महिलेचा आक्षेप आहे. परंतु, या महिलेनंच बेकायदेशीर पद्धतीनं आपल्या घराचा दुसरा माळा चढवलेला आहे, असंही त्यानं म्हटलंय. 

पण, वादात अडकण्याची अभिजीतची ही काही पहिलीच वेळ नाही... ऑक्टोबर २०१६ मध्येही एका ३४ वर्षांच्या महिलेला शिवीगाळ करण्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.