दिवाळी होणार ब्लॉकबस्टर! ‘भावड्याची चावडी'त सिध्दार्थ जाधव करणार दुप्पट धम्माल

‘चावडी’चा दिवाळी विशेष भाग

Updated: Nov 6, 2020, 12:28 PM IST
दिवाळी होणार ब्लॉकबस्टर! ‘भावड्याची चावडी'त  सिध्दार्थ जाधव करणार दुप्पट धम्माल  title=

मुंबई : नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीवरील ‘भावड्याची चावडी’ या धमाल विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका कितीतरी पटीने वाढविला आहे. चावडी ही अशी एक जागा आहे, जिथे कटिंग चहा घेत मित्र एकत्र जमतात आणि गप्पा मारतात. या गप्पांमधून त्यांच्यातील मैत्रीचे नाते अधिकच घट्ट होते. या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी चावडीचा माहोल निर्माण केला असून त्यास उदंड प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवा खजिना उपलब्ध झाला असून या कार्यक्रमाचा सूत्रधार पार्थ भालेराव मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांना या चावडीवर गप्पा मारण्यासाठी आमंत्रित करतो.

दर आठवड्यास प्रेक्षक आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे कलाकार या चावडीवरील धमालमस्ती अनुभवतात. पण ‘भावड्याची चावडी’च्या या आठवड्याच्या भागात दुहेरी धमाल होणार आहे; कारण मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ जाधव त्यात सहभागी होणार आहे. मिश्कील उत्तरे देण्याबद्दल सिध्दार्थ विख्यात असल्याने त्याच्या चित्रपटांप्रमाणेच या आठवड्यातील ‘चावडी’चा हा भागही ब्लॉकबस्टर असेल, यात शंका नाही! या दिवाळी विशेष भागात सिद्धार्थने चावडीवर मजा-मस्ती तर केलीच पण इतकेच नव्हे, तर आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने तो प्रेक्षकांना थक्क करून सोडणार आहे. शिवाय कार्यक्रमातील कलाकारांबरोबर तो काही धमाल क्षणही अनुभवणार आहे.

‘चावडी’च्या या दिवाळी विशेष भागात सहभागी होण्याची संधी मिळाली याबद्दल सिध्दार्थ जाधवने सांगितले, “भावड्याच्या चावडीवर येऊन आणि भावड्या व त्याच्या मित्रांशी मनसोक्त गप्पा मारून मला खूप मजा आली आणि मी या चावडीवर घालवलेला प्रत्येक क्षण खूप एन्जॉय केला. हा दिवाळी विशेष भाग पाहताना प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट होईल आणि प्रेक्षक देखील हा भाग एन्जॉय करतील याची मला खात्री आहे.”

येत्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ‘भावड्याची चावडी’चा हा दिवाळी विशेष भाग पाहण्यास विसरू नका फक्त ‘झी वाजवा’ वाहिनीवर!