मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॅक टू बॅक तीन चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'स्ट्रीट डांन्सर', 'साहो' आणि 'छिछोरे' या आगामी चित्रपटातून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा सध्या व्यवसायिक चर्चेसह वैयक्तिक कारणानेही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाचं नाव फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासह जोडलं जात आहे. दरम्यान, श्रद्धाने रोहन आणि तिच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना नकार दिला होता.
परंतु आता श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत श्रद्धा, रोहन किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परंतु 2018 पासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.
याआधी श्रद्धा आणि फरहान अख्तर रिलेशनशिपमध्ये असल्याचं, त्यामुळे शक्ती कपूर खूश नसल्याचंही बोललं जात होतं. एका मूलाखतीत शक्ती कपूर यांनी श्रद्धाने येत्या वर्षापर्यंत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता श्रद्धा आणि रोहन लग्नबंधनात अडकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.