नाट्यगृहांमध्ये जॅमर लावण्याचा प्रस्ताव; मोबाईलचा खणखणाट नकोच

लवकरच या दृष्टीने पावलं उचलली जाण्याची शक्यता   

Updated: Jun 11, 2019, 01:01 PM IST
नाट्यगृहांमध्ये जॅमर लावण्याचा प्रस्ताव; मोबाईलचा खणखणाट नकोच title=

मुंबई : एखादं नाटक, चित्रपट किंवा कोणतीही कलाकृती पाहण्यास जाताना 'कृपया मोबाईल बंद  करा', अशी सूचना करण्यात येते. पण, या सूचनेचं सर्वजण पालन करतातच असं नाही. अनेकदा याचे परिणाम एखाद्या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान पाहायला मिळाले आहेत. ज्यामुळे कलाकारांना बऱ्याचदी अडचणींचाही सामना करावा लागला आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नाट्यगृहांमध्ये जॅमर लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

महापालिकेच्या विधी आणि महसूल समितीच्या  अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर अभिनेता सुमीत राघवन यानेही त्याला दुजोरा देत त्याविषयी समाधान व्यक्त केलं आहे. 

 

नाट्यप्रयोग सुरू होण्याआधी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा अशी विनंती वारंवार करण्यात येते. पण, रसिकांकडून मात्र हा नियम बऱ्याचदा पाळला जात नाही. त्यामुळे व्यासपीठावर असणाऱ्या कलाकारांचं लक्ष विचलित होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. हीच परिस्थिती पाहता नाट्य रसिकांना कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद हा कोणत्याही अडथळ्याशिवाय घेता यावा म्हणून आपण हा ठराव मांडत असल्याचं शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे. 

म्हात्रे यांच्या पत्रकाच्या प्रतीला फोटो पोस्ट करत सुमीतनेही हे अतिशय महत्त्वाचं पाऊल असल्याचं स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे त्याने वस्तुस्थिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला असून, अनेक गोष्टींची आधी तपासणी होईल आणि त्यानंतरच ही प्रक्रिया पुढे जाणार असल्याचं सांगितलं. मुळात प्रेक्षकांनी त्यांची भूमिका ओळखत कलाकारांना सहकार्य केल्यास आणि काही नियमांचं पालन केल्यास अशी पावलं उचलण्याची वेळही येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं.