सगळ्यांना हसवणारी शिवाली आता रडवणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shivali Parad Upcoming Marathi Movie : शिवाली परबच्या आगामी चित्रपटानं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नव्या आणि हटके भूमिकेत दिसणार 'कल्याणची चुलबुली' 

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2024, 05:49 PM IST
सगळ्यांना हसवणारी शिवाली आता रडवणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला title=
(Photo Credit : Social Media)

Shivali Parad Upcoming Marathi Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची क्रेझ प्रेक्षकांना आजही आहे. या कार्यक्रमानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे असं म्हणता येईल. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात अनेक कलाकार पोहोचले. या कार्यक्रमातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. तर त्यापैकी एक कलाकार म्हणजे कल्याणची चुलबुली अभिनेत्री शिवाली परब ही छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठ्या पडद्यावर स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ते कसं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर लवकरच शिवालीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शिवालीचा जो आगामी चित्रपट आहे. त्याचं नाव 'मंगला' आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु होती. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन 'मंगला' हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी 2025 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची तारिख समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या 'मंगला' या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास शिवालीमार्फत या चित्रपटातून पाहता येणार आहे. नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची तारिख घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून या हल्ल्याची प्रचिती ही येतच आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत असून त्यांच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला आणि त्यात चेहऱ्यावर झालेल्या जखमा यांच्या खूणा पाहायला मिळत आहेत. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.

'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या  पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा 10 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.