बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट मागील गुरुवारी प्रदर्शित झाला होता. पठाण आणि जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर प्रेक्षकांना शाहरुख खानच्या या चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. दुसरीकडे शाहरुख खान आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह काम करत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. पण या भावूक चित्रपटाला त्याच्या हक्काचे प्रेक्षक मिळाले आहेत. ज्यामुळे चित्रपट पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे.
चित्रपटगृहात एक आठवडा झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. डंकी शाहरुखच्या यावर्षी आलेल्या आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. यामध्ये अजिबात अॅक्शन नाही किंवा हिरोला अत्यंत दमदार भूमिकेत दाखवणारे क्षणही कमी आहेत. चित्रपटाचं संपूर्ण लक्ष कथेवर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही भावूक गोष्ट आवडत आहे. चित्रपट पाहण्यासाठी कुटुंबं एकत्र जात असून, बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे.
बुधवारी आलेल्या ट्रेड रिपोर्टनुसार, शाहरुखच्या चित्रपटाने सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 9 ते 10 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कनुसार, मंगळवारी चित्रपटाने भारतात 11.56 कोटींची कमाई केली होती. यासह चित्रपटाची कमाई 141 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
डंकीने 7 दिवसात एकूण 150 कोटींचा आकडा पार केला आहे. शाहरुखचे यावर्षी प्रदर्शित झालेले पठाण आणि जवान या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कमाईचे नवे रेकॉर्ड्स रचले होते. त्यामुळे डंकीकडून लोकांना अशाच अपेक्षा होत्या. पण डंकी आधीच्या दोन्हीच्या तुलनेत वेगळा चित्रपट असल्याने 150 कोटींची कमाईदेखील विशेष आहे.
यावर्षी बॉलिवूडने कुटुंबाला आवडतील असेही अनेक चित्रपट आणले, ज्यांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. 'जरा हटके जरा बचके', 'सत्यप्रेम की कथा', 'तू झूठी मैं मक्कार' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारख्या नॉन-एक्शन चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
'डंकी'ने सातव्या दिवसाच्या कमाईमध्ये रणबीरच्या 'तू झुठी मैं मक्कार'ला मागे टाकलं आहे. रणबीरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटी रुपयांची कमाई केली होती. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा 2023 चा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉन-अॅक्शन, कौटुंबिक प्रेक्षक चित्रपट होता. त्याची कमाई 153 कोटी होती. डंकी आठव्या दिवसाच्या कमाईसह 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मागे सोडेल.