Shah Rukh Saree Video:: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या चर्चेत आहे तो इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच 'आयफा'च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखची अँकरींग, डान्स, पुरस्कार जिंकल्यानंतरचं भाषण या साऱ्या गोष्टी चर्चेत राहिल्याच. मात्र सोहळ्यादरम्यान त्याने केलेल्या अन्य एका कृत्याचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
झालं असं की, या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या 'मीसेस चॅटर्जी व्हेर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकली. राणीला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ती स्टेजवर आली. तिने कार्यक्रमाचा होस्ट असलेला दिग्दर्शक करण जोहरच्या गालाला गाल लावून त्याला ग्रीट करत मिठी मारली. हे सारं सुरु असताना शाहरुख करणच्या बाजूलाच उभा होता. राणी पुरस्कार जिंकल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजच्या दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या माईककडे जात असताना शाहरुखला तिच्या साडीचा पदर लोळत असल्याचं दिसलं. शाहरुखने लगेच तिचा पदर हातात घेतला आणि तिच्या मागे चालू लागला. शाहरुखला हे करताना पाहून राणीही गालात खुदकन हसली. तिने या मदतीसाठी शहारुखचे आभार मानले. 'आयफा'च्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन हा व्हिडीओ आणि फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
'आयफा'ने हा व्हिडीओ शेअर करताना, पुन्हा आम्ही आठवणींमध्ये रमून गेलो. राणी, शाहरुख आणि करणचं असं एकत्र येणं खरोखरच खास आहे, अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे.
नंतर शाहरुख राणीचा पदर पकडून तिच्या मागून चालत असल्याचे फोटो शेअर करत 'आयफा'ने, "पुन्हा एकदा चलते चलते... (हा या दोघांचा चित्रपट आहे) शाहरुख आणि राणीची सुंदर जोडी आपल्याला पाहायला मिळाली," अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट...
शाहरुखची ही कृती त्याच्या चाहत्यांना भावली असून उगाच नाही त्याला जंटलमन म्हणत असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय. अनेक चाहत्यांनी शाहरुख-काजोल आणि शाहरुख-राणी ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील सदाबहार जोड्यांपैकी एक आहे असं म्हटलं आहे. काही चाहत्यांनी तर या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम केलं पाहिजे असं म्हटलं आहे. शाहरुख आणि राणी या दोघांचा अभिनय उत्तम असून आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची केमिस्ट्रीही उत्तम असून त्यांनी खरोखरच एकत्र काम करण्याचा विचार केला पाहिजे असं अनेकांनी या फोटो आणि व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राणीबरोबरच शाहरुखलाही 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.