'सत्यशोधक' पाचव्या आठवड्यात दाखल; प्रेक्षकांना सिनेमाची भुरळ

काही दिवसांपुर्वी सत्यशोधक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या ट्रेलर, टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.

Updated: Feb 5, 2024, 06:13 PM IST
'सत्यशोधक' पाचव्या आठवड्यात दाखल; प्रेक्षकांना सिनेमाची भुरळ title=

मुंबई : समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हाऊसफुलच्या रांगेत जाऊन बसला होता, आणि कौतुकाची बाब म्हणजे आता या चित्रपटाचा थेट पाचवा आठवडा सुरू झाला आहे.

‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या ट्रेलर, टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. महापुरूषांचा इतिहास आपल्या लहान मुलांना कळावा यासाठी अनेक प्रेक्षक आपल्या पाल्यांसह या चित्रपटाला येत आहेत. तसेच टॅक्स फ्री झाल्याने प्रेक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची ओळख जागतिक पातळीवर झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आणि ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे रेड कार्पेट प्रीमियर सोहळा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित होईल.

महात्मा फुलेंच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांचे विशेष कौतुक होत आहे. संदीप-राजश्री यांच्यासह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात होते. 

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, संकल्पना - राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  यानिमित्ताने काही दिवसांपुर्वी अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती, यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले, होते.