बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतंच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
'हिरामंडी' या वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, ऋचा चड्ढा आणि शरमीन सेगल या कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे. त्याबरोबरच यात भव्यदिव्य सेट, शाही थाट आणि आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच यात रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शन सर्वच पाहायला मिळणार आहे. तसेच 'हिरामंडी' या वेबसीरिजचा भव्य दिव्य सेटही दिसत आहे.
'हिरामंडी' ही वेबसीरिज ब्रिटिशकाळात ओळखल्या जाणाऱ्या ‘हिरामंडी’ भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या नायिकांवर आधारित आहे. भारत आणि पाकिस्तान फाळणी होण्यापूर्वी अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानातील काही स्त्रिया 'हिरामंडी'मध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हा चित्रपट भाष्य करणार आहे. या वेबसीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या वेबसीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल आणि संजीदा शेख हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही वेबसीरिज कधी प्रदर्शित होणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण 2024 या वर्षातच ही वेबसीरीज प्रदर्शित होऊ शकते, असं बोललं जात आहे.
दरम्यान 'हिरामंडी' या वेबसीरिजद्वारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. नेटफ्लिक्सची ही अत्यंत महागडी वेबसीरिज आहे, असं बोललं जात आहे. तसेच यात भन्साळींच्या इतर चित्रपटांप्रमाणेच भव्य दिव्य सेट पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी 'हिरामंडी' चित्रपटावर भाष्य केले होते. 'हिरामंडी' ही माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधील महत्त्वाची कलाकृती आहे. ही सीरिज एका वेगळ्या विषयावर आधारित असून ही एक महत्त्वकांक्षी, भव्य सीरिज आहे. त्यामुळे मी यासाठी खूप उत्सुक आहे. गेल्या 14 वर्षांपासून मी या वेबसीरिजवर काम करत आहे. आता लवकरच ही सीरिज जगासमोर येणार आहे.