मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यात नेमकं काय चालंलय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांना नेहमीच रस असतो. त्याच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. सलमानही त्याच्या चाहत्यांना मोकळेपणाने भेटतो. मात्र यावेळी सलमानच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे.
आजकाल त्यांची सुरक्षितता हा देखील चिंतेचा विषय आहे. त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अलीकडेच दोन संशयितांनी पनवेल, असलेल्या अभिनेत्याच्या फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या दोघांना पकडल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये दोघांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवून पकडण्यात आलं आहे.त्यानंतर दोघांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.दोन्ही तरुणांच्या हालचाली संशयास्पद होत्या मात्र दोघांनीही आपण चाहते असल्याचा दावा केला आहे.
याआधी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती
याआधी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे वडील ख्यातनाम पटकथा लेखक सलीम खान यांना बांद्रा बँडस्टँडच्या बेंचवर हे धमकीचं पत्र मिळालं होतं. सलमानच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून बिश्नोई गँगच्या तिघा शार्पशूटरना वाशीमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सलमानला मुंबई पोलिसांच्या वतीनं वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा घडलेल्या प्रकारावरुन सलमानच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लॉरेन्स बिश्नोईने २०११ मध्ये 'रेडी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ल्याची योजना आखली होती. मात्र त्याचा तो प्लान अयशस्वी झाला. पंजाबमध्ये सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याही हिटलिस्टवर सलमान असल्याचं समजतंय. त्यामुळं लाखो चाहत्यांचा जीव की प्राण असलेल्या भाईजानचा जीवच धोक्यात आला होता. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.