सलमान खानचं लवकरच छोट्या पडद्यावर 'कमबॅक'

टेलिव्हिजनविश्वात सलमान घेऊन येतोय आणखी एक नवीन कार्यक्रम

Updated: Feb 7, 2019, 11:44 AM IST
सलमान खानचं लवकरच छोट्या पडद्यावर 'कमबॅक' title=

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खान चित्रपटसृष्टीत त्याच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो टीव्हीविश्वातही प्रसिद्ध आहे. टीव्हीवरील 'बिग बॉस' या रिऍलिटी शोमधील सलमानचे सुत्रसंचालन प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानने टीव्हीविश्वात निर्माता म्हणूनही पाऊल ठेवले आहे. निर्मिती क्षेत्रातील यशानंतर सलमान आता टीव्हीवर आणखी एक नवा कार्यक्रम आणण्याच्या तयारीत आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध रेसलर 'गामा पहलवान' यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या कार्यक्रमात सोहेल खान आणि मोहम्मद नजीम प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. पुनीत इस्सर या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

सलमानला 'गामा पहलवान' यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायचा होता. परंतु काही कारणांमुळे तो चित्रपट बनवू शकला नाही परंतु आता सलमान त्याच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत 'गामा पहलवान' यांच्यावर आधारित कार्यक्रम बनवण्याच्या तयारीत आहे. या कार्यक्रमाचे चित्रिकरण पंजाब आणि लंडनमध्ये चित्रित केले जाणार असून एप्रिलमध्ये चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. 'गामा पहलवान'मधून सलमान आणि सोहेल ही भाईजान जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी 'भारत' चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. 

गामा पहलवान यांचे खरं नाव गुलाम मोहम्मद होते. ते त्यांच्या काळातील सर्वोत्तम रेसरल होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच हार पत्करली नाही. भारत-पाकिस्तानच्या विभाजनावेळी त्यांना पाकिस्तानात जावे लागले. त्यानंतर २३ मे १९६० साली वयाच्या ८२व्या वर्षी  त्यांचे लाहोरमध्ये निधन झाले. गेल्या वर्षी पटियालामध्ये 'गामा पहलवान' या कार्यक्रमाचे पायलट चित्रिकरण केलं गेलं होतं. हे चित्रिकरण चॅनलला अतिशय आवडलंही होते. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे.