मुंबई : टीव्हीविश्वातील आघाडीची सुप्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. 'दया बेन'च्या मालिकेतील एक्झिटनंतर आता आणखी एक जण मालिका सोडण्याच्या तयारीत आहे. मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी 'सोनू' मालिका सोडणार आहे. सोनू भूमिका साकारणाऱ्या निधि भानुशालीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
निधि सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती मालिकामधून बाहेर पडत असल्याचं सांगण्यात येत आहे. निधि मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये शिकत आहे. मालिकेमुळे तिला अभ्यासावर लक्ष देता येत नसल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. अनेकदा सोनूला 'तारक मेहता...'च्या सेटवर अभ्यास करताना पाहण्यात आलं आहे.
मालिकेच्या निर्मात्यांनी निधिच्या या निर्णयावर कोणतीही समस्या नसून निधिने आधी तिचं शिक्षण पूर्ण करावं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी निधिला शूटींगवेळी काही सूट देण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. परंतु निधिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निधिने आधीच्या ६ वर्षांपासून भूमिका साकारणाऱ्या 'सोनू' झील मेहताला रिप्लेस केलं होतं.
मालिकेतील 'दया बेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी, दिशाने तिच्या प्रसुतीवेळी रजा घेतली होती. त्या रजेचा कालावधी आता संपला असल्याचं सांगितलं. दिशाला निर्मात्यांकडून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले आहे.