Salman Khan : सेलिब्रिटी मंडळी कुठे राहतात, कसे राहतात, त्यांची जीवनशैली कशी आहे इथपासून या मंडळींच्या पेहरावापासून अगदी त्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत चाहत्यांमध्ये कमाल कुतूहल असतं. आपल्या आवडीचे कलाकार नेमकं कसं आयुष्य जगतात? याच एका प्रश्नाची उकल करत मग ही चाहतेमंडळी उत्तराच्या शोधात काही अशा गोष्टींपर्यंत पोहोचतात ज्यामुळं ते पुरते भारावून जातात.
सेलिब्रिटी मंडळी दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी वापरतात, त्या सर्व गोष्टी, वाणसामान आणि सर्वकाही नेमकं कोणत्या ब्रँडचं असतं याचंही चाहत्यांना कुतूहल. अशा सेलिब्रिटींच्या आवडीच्या ब्रँडची माहिती नुकतीच समोर आली आहे. हा ब्रँड किंबहुना हे एक ठिकाण जिथं सेलिब्रिटींना आवश्यक ते सर्व सामान मिळतं, त्याचं नाव आहे फूड स्क्वेअर.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या प्रॉपर्टीवर या ब्रँडनं फूड मॉल सुरू केला असून, ई टाईम्सच्या वृत्तानुसार सलमानच्याच मुंबईतील लिंकिंग रोड इथं असणाऱ्या एका प्रॉपर्टीमध्ये भाडेतत्वावर हे दुकान सुरू झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इथं महिन्याचं भाडं 1 कोटी रुपये इतकं आहे.
सलमाननं 2012 मध्ये सांताक्रूझ लिंकिंग रोड इथं ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. यासाठी त्यानं 120 कोटी रुपये इतकी किंमत मोजली होती. यानंतर सलमानच्या या प्रॉपर्टीमध्ये 2017 ला लीज तत्त्वावर फूड मॉल सुरू करण्यात आला. सलमानच्या या प्रॉपर्टीमज्ये सुरू असणाऱ्या आलिशान किराणा दुकानामध्ये अनेक धनिक आणि सेलिब्रिटी मंडळी येतात आणि इथं मांसाहारी पदार्थ, फळं, भाज्या, खाण्यापिण्याच्या गोष्टी, परदेशी उत्पादनं आणि कैक प्रकारचं सामान मिळतं.
एका प्रसिद्ध फूड ब्लॉगरनं नुकतंच या दुकानाला भेट दिली होती. रिलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार इथं जपानी, कोरियन आणि कैक परदेशी फळांची आणि मांसाहारी पदार्थांची विक्री केली जाते. जाणून आश्चर्य वाटेल पण, इथं स्ट्रॉबेरीचे प्रति किलो दर आहेत 6000 रुपये आणि माऊथ फ्रेशनर किंवा टूथपेस्ट मिळतेय 5000 रुपयांना. फक्त भाज्याच नव्हे, तर श्रीमंतांच्या या किराणा दुकानात एक कोपरा फक्त मद्य आणि तत्सम पदार्थांसाठी आहे. इतकंच नव्हे, तर इथं पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचेही बरेच प्रकार आणि विविध प्रकारचं इम्पोर्टेड पाणीसुद्धा विकलं जातं.