मुंबई : सध्या देशात कोरोना कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा आजार प्राण्यांमुळे होत असल्याची समज नागरिकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे पाळीव प्राणी घराबाहेर सोडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने नागरिकांना आपले पाळीव प्राणी घरा बाहेर न सोडण्याची विनंती केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने नागरिकांची समज घातली आहे. तो म्हणला 'सध्या जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला घाबरुन जाऊ नका. हा विषाणू कुत्र्यांमुळे किंवा प्राण्यांमुळे पसरत नाही.' शिवाय आतापर्यंत पाळीव प्राण्यांमुळे या धोकादायक विषाणूची लागण झाल्याचा एकही पुरावा नसल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.
रोहित शेट्टीने नागरिकांना आवाहन करत एक इन्फ्रोग्राफीक शेअर करत कुत्र्यांपासून करोनाचा प्रसार होत नसल्याचं म्हटलं आहं. तर, कोरोनाचा संसर्ग प्राण्यांपासून होत नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
दरम्यान, देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने महाराष्ट्रात अखेर संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.