रॉकस्टार नवरी; नवरदेवाला म्हणते, तेरेलिये दुनिया छोड दी है....

नवरीबाईचा असा अंदाज पाहून प्रत्येक मुलगा म्हणेल....   

Updated: Sep 23, 2021, 11:38 AM IST
रॉकस्टार नवरी; नवरदेवाला म्हणते, तेरेलिये दुनिया छोड दी है....  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : प्रेमाचा प्रवास जेव्हा लग्नाच्या टप्प्यावर येऊन पोहोचतो तेव्हा मोठा पल्ला गाठल्याची भावना प्रत्येक प्रेमी युगूलाच्या मनात असते. वधू- वरांच्या मनात असणारा कोलाहल तर, शब्दांत मांडणंही कठीण. लग्नविधीसाठी जाईपर्यंत त्यांच्या मनात अनेक गोष्टींची गणितं सुरु असतात. यामध्ये भावनांची उलथापालथ सुरू असते ती वेगळी. प्रेम केलं तिच व्यक्ती आजच्या क्षणापासून आयुष्यभराची साथीदार होणार याची जाणिवच व्यक्तीला परिपूर्ण करुन जाते. 

भावनांची हीच साखळी मग व्यक्त होत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते. लग्नसोहळ्यांमध्ये याच धर्तीवर अनेकदा गाणी, नृत्य, किंवा अफलातून परफॉर्मन्स पाहायला मिळतात. सध्या अशाच एका लग्नसोहळ्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लेहंगा आणि संपूर्ण साजश्रृंगार केलेली एक नववधू गिटारच्या साथीनं तिच्या साथीदारासाठी सुरेख गाणं गाताना दिसते. 'तेरेलिये दुनिया छोड दी हैं', असे या गाण्याचे बोल असून, ते म्हणताना तिच्या चेहऱ्यावरचे भावही सारंकाही सांगून जात आहेत. 

'एअरलिफ्ट' या चित्रपटातील हे गाणं गाणारी नवरी पाहून, ही तर रॉकस्टार आहे अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. मुख्य म्हणजे हे गाणं ज्याच्यासाठी सादर केलं त्या नवरदेवाचंही मन या गोड परफॉर्मन्सनं पाघळलं असणार यात शंकाच नाही. 

गिटार वाजवत गाणं गाणाऱ्या या नवरीचं नाव आहे सोनल. तिच्या मेकअप आर्टिस्टनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. मनातल्या भावनांना गाण्यावाटे वाचा फोडणाही ही नवरी तुम्हाल कशी वाटली?