आत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल

Raj Thackeray on Nitin Desai Death : नितीन देसाई यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यासमोर एक सवाल उपस्थित केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 2, 2023, 04:57 PM IST
आत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल title=
(Photo Credit : Social Media)

Raj Thackeray on Nitin Desai Death : लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी नितीन देसाई यांनी इतका मोठा निर्णय का घेतला. टोकांच पाऊल उचलण्यामागे कारण काय होतं त्याविषयी अनेकांना प्रश्न पडले आहे. एकीकडे सगळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी असं बोलत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी थेट सवाल केला आहे. 

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी नितीन देसाई यांचा एक फोटो शेअर केला आहे. तर त्यासोबतच त्यांची कॅप्शन देत सगळ्यांना एक सवाल केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, 'ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.'

हेही वाचा : नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण?

नितीन देसाई यांच्या निधनानंतर अनेक गोष्टींवर चर्चा सुरु आहे. त्यापैकी एक म्हणजे ते काल रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईला विमानानं आले होते. त्यानंतर ते कारनं कर्जतच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले. ते कर्जतच्या या स्टुडिओमध्ये रात्री 2.30 च्या सुमारास पोहोचले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्या. या व्हॉईस क्लीपमध्ये त्यांनी काही बिझनेसमनची नावं घेतल्याचे म्हटले जात आहे. 

नितीन देसाई यांच्यावर होतं 250 कोटींच कर्ज! 

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या निधनाचे कारण त्यांच्यावर असलेलं व्याजासहीत 250 कोटींचं कर्ज होतं. कर्ज परत फेड करण्यासाठी नितीन देसाई यांनी त्यांची जमिनी गहाण ठेवली होती. हे कर्ज नितीन देसाई आणि त्यांच्या पत्नीनं एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन या कंपनीकडून घेतलं होतं. आर्थिक विवंचनेत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन या कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यासमोर नितीन यांची संपर्ण संपत्ती जप्त करून त्यातून कर्जाची परत फेड करण्यास सांगितले होते.