मुंबई : अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. पंच्याहत्तर वर्षांचे झाले ते. शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक वॉलवर बिग बींना व्यंगचित्रातून खास शुभेच्छा दिल्यात.
१९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं : 'हे सर्व कोठून येतं?', असे राज यांनी शुभेच्छा देताना पोस्ट केलंय.
राज यांनी बच्चन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुंचल्यातून शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महानायकाच्या अभिनय कारकीर्दीतले महत्वाचे टप्पे सहा चित्रांमध्ये रेखाटलेत.