बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या आपला आगामी चित्रपट 'अंडर ट्रायल 69' चं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. राज कुंद्राला 2022 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट त्यावरच भाष्य करणारा आहे. अटकेआधी आणि नंतर आलेले अनुभव राज कुंद्रा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. दरम्यान राजु कुंद्रा याने याने अटकेनंतर आपल्या नेमक्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याची माहिती दिली आहे. जेलमध्ये आपल्याला नग्न करण्यात आल्याचाही अनुभव त्याने यावेळी सांगितला.
PinkVilla ला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने सांगितलं की, "ती फार अपमानास्पद भावना होती, कारण ते तुम्हाला नग्नच करतात. तुम्ही पार्श्वभागात काही काही अंमली पदार्थ घेऊन जात आहात की नाही हे तपासण्यासाठी ते तुम्हाला सर्वांसमोर नग्न करत तपासतात. यामुळे तुम्हाला आपण सर्व प्रतिष्ठा गमावून बसलो आहोत असं वाटू लागतं".
पुढे त्याने म्हटलं की, "आपण आधीच इतकं काही सहन केलं आहे असं वाटत असतं आणि हे तुम्हाला नग्न करतात. मीडिया तर आधीच मला नग्न करत होती. त्यावर हेदेखील झाल्यानंतर मला फार दुखावल्याचं वाटत होतं".
राज कुंद्राने यावेळी चित्रपटावरुन निर्माण झालेले वाद आणि सोशल मीडियावरुन मिळणारा द्वेष यावरही भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी घालण्याचा ट्रेंड सुरु आहे. 'ज्याप्रकारे या माणसाने महिलांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, याच्या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे,' असं ट्वीटही त्याला वाचून दाखवण्यात आलं. यावर भाष्य करताना त्याने सांगितलं की, "तुमच्या आरोपांना दुजोरा देणाऱ्या एका तरी महिलेचं नाव सांगा. एखाद्यावर आरोप करणं सोपं आहे, पण आधी तुमच्या आरोपाला सिद्ध करणारा पुरावा द्या. हा द्वेष मीडियानेच तयार केला आहे,".
'अंडर ट्रायल'च्या ट्रेलर लाँचवेळी राज कुंद्राने आपण जेव्हा हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिल्पा शेट्टीची काय प्रतिक्रिया होती याची माहिती दिली. "जेव्हा मी तिला चित्रपट करतोय हे सांगण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती माझ्यापासून काही अंतरावर होतो. मला तिच्या जवळ जायचं नव्हतं," असं राज कुंद्राने सांगितलं.