मुंबई : देवा आजारपण नको देऊस कोणाला, असंच आपण सर्वजण म्हणत असतो. मित्रांपासून अगदी आपल्याला जी माणसं आवडत नाहीत त्यांनाही आजारपण नको देऊस देवा अशीच इच्छा आपल्या मनात असते. कारण आजारपणानं खंगणं म्हणजे नेमकं काय असतं हे सर्वजण जाणतो.
मालिका जगतात एक काळ गावणाऱ्या आणि सालस सुनेच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्रीनं मात्र आजारपणानं खचून न जाता त्याच्या नाकावर टिच्चून आयुष्य जगण्याची कला अंगी बाणवली आहे.
काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला Prolactin Tumour, थायरॉईड आणि अशा काही शारीरिक समस्या उदभवल्याचं या अभिनेत्रीनं सर्वांनाच सांगितलं.
साधंसुधं वाटणारं आजारपण गंभीर रुप घेत गेलं आणि सततच्या चाचण्या, डॉक्टरांच्या फेऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्याचा एक भाग बनलं. काही प्रसंगांनी खचून गेलेली आणि पुरती कोलमडलेली ही अभिनेत्री परिस्थितीला स्वीकारत बरीच धीट झाली.
आजारपण ते, कवटाळून किती बसायचं असं म्हणज त्यासोबतच ती जगायला शिकली आणि आता बऱ्याच अंशी तिनं दुखण्याखुपण्याला दूरही लोटलं आहे.
MRI ची सुरुवातीला वाटणारी भीती आता कुठच्याकुठे पळाली, असा अनुभव सांगताना त्या कर्कश आवाजातही मला गाढ झोप लागते म्हणणारी ही अभिनेत्री आहे जुई गडकरी. (Prolactin Tumour surviver actress jui gadkari shares her kedarnath dham yatra photos)
मालिका आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या जुईनं दृढ निश्चय केला आणि आज ती अनेकांसाठी आदर्श आहे. काम, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या साऱ्यामध्ये समतोल साधत जुई थेट केदारनाथ धाम इथं पोहोचली.
आपल्या स्वप्नातील एक ठिकाण असा उल्लेख तिनं केदारनाथविषयीच्या पोस्टमध्ये केला. पर्वतरांगांमध्ये दडलेल्या आणि निसर्गसौंदर्यानं नटलेल्या या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तिथच्या पवित्र वातावरणानं जुई पुरती भारावली.
मंदिराच्या त्या प्रसन्न वातावरणात येणाऱ्या-जाणाऱ्या लाखो श्रद्धाळूंच्या गर्दीत तीसुद्धा होती. असं म्हणतात, कामाचा कितीही व्याप असो, नशीबानं कितीही चकवा दिलेला असो स्वत:ला शोधण्यासाठी प्रवास तोही निसर्गाच्या सानिध्ध्यातील प्रवास कधीही फायद्याचा.
जुईनंही हाच मार्ग निवडला आणि हे आनंदाचे क्षण सोबतीनं घेऊन ती निघाली पुढच्या प्रवासाला. Happy Journey जुई!