मुंबई : कोरोना व्हायरसने राज्याला वेढीस धरले आहे. आतापर्यंत ३९ कोरोनाग्रस्त रूग्ण राज्यात सापडले आहेत. या धर्तीवर राज्य सरकारने मॉल्स आणि थिएटर बंद केले आहेत. एवढंच नाही तर सिनेमा आणि मालिकांच चित्रिकरण देखील थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचा आर्थिक नियोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी अभिनेता प्रशांत दामले कलाकारांसाठी धावून आले आहेत.
प्रशांत दामले यांनी पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या जात आहे. यामुळे अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल याची अजून खात्री नाही आहे. पण तोपर्यंत सहकार्य म्हणून प्रशांत दामले यांनी २३ जणांना प्रत्येकी १०,००० रुपये दिले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. परिणामी याचा फटका यावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांना बसला आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह यांवरील बंदी उठेपर्यंत संसार कसा चालवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र तेवढ्यातच पडद्यामागच्या या कलाकारांच्या मदतीसाठी एक हात पुढे सरसावला आहे. प्रशांत दामलेंनी घेतलेल्या या प्रशंसात्मक निर्णयाच सगळ्याच स्तरावरून स्वागत होत आहे. कलाकार म्हणून आपल्यासोबतच्या सर्वांना समजून घेत प्रशांत दामलेंनी हे पाऊल उचललं आहे.
सिनेमा, नाटक या इंडस्ट्रीकरता अनेक लोकं कार्यरत असतात. या सगळ्यांचा विचार करून प्रशांत दामले यांनी निर्णय घेतला आहे. करोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने काही नाटकांचे परदेश दौरेही रद्द करण्यात आले आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा दक्षिण आफ्रिकेतील दौरा रद्द करण्यात आला आहे.