मुंबई : 2016-17 मध्ये अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री कंगना कनौत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. बॉलिवूडची क्वीन असलेल्या कंगनाला मुंबईतील खार पोलीस स्टेशनमधून समन्स पाठवण्यात आला आहे. कंगना, तिची बहिण रंगोली आणि तिच्या स्टाफच्या विरोधात एका प्रॉपर्टी डीलरने तक्रार दाखल केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कंगनाने मुंबईच्या पाली हिलमध्ये एक बंगला खरेदी केला आहे. पण बंगला खरेदी करतांना प्रॉपर्टी डीलरला तिने त्याचं पूर्ण कमिशन न दिल्याने त्याने ही तक्रार दाखल केली आहे. पण कंगनाने दावा केला आहे की, तिच्या फायनान्स टीमने एक टक्के कमिशन असेलेले 20 लाख रुपये डीलरला दिले आहेत. पण प्रॉपर्टी डीलर आता 2 टक्के कमिशनची मागणी करत आहे.
यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटी प्रॉपर्टी डीलर प्रकाश रोहिराने यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रार केली आहे की, 'बंगला खरेदी करताना तेच दलाल होते पण कंगनाने त्यांना पूर्ण पेमेंट नाही केलं.'